Tuesday, February 22, 2011

कुंद कहा, पयवृंद कहा - कविराज भुषण



इथल्या मातीचे ढेकूळ पाण्यात टाका ... जो तवंग उमटेल तो इतिहासाचाच  ... वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही ... वेडी माणसेच इतिहास निर्माण करतात ... आणि मग त्या इतिहासाचे कोडकौतुक गाण्यासाठी आपोआप झंकारून उठतात ..... शाहिराची डफ तुनतुनी आणि थरारून उठते महाकवींची नवोन्मेषशालीनी लेखणी ... शिवरायांचा चरित्रचंद्र पाहून कविराज भुषणांचीही प्रतिभा गंगासागराप्रमाणे उफाळून आली ...


कुंद कहा, पयवृंद कहा, 
अरूचंद कहा सरजा जस आगे ?
भूषण भानु कृसानु कहाब 
खुमन प्रताप महीतल पागे ?
राम कहा, द्विजराम कहा, 
बलराम कहा रन मै अनुरागे ?
बाज कहा मृगराज कहा 
अतिसाहस मे सिवराजके आगे ?

सरणार कधी रण प्रभू तरी - कुसुमाग्रज



 चढत्या वाढत्या हिंदवी स्वराज्यावर .. शत्रूही अहि-महीच्या चढत्या बळाने तुटून पडत होते .... रायगडाच्या अभेद्य तटबंदीसारखीच स्वत:च्या देहाची तटबंदी पावनखिंडीत उभी करून झुंजणारे ... हे बाजीप्रभू देशपांडे ..... देवांनाही हेवा वाटावा असा इतिहास इथे घडला ... या पावनखिंडीत .. बाजींच्या देहाची चाळण उडाली होती .. रक्ताचे अर्घ्य ओसंडत होते .. प्रत्येक अर्घ्य विनवीत होता ... " स्वातंत्र्याच्या सूर्या ! .. आता तरी प्रसन्न हो "...


सरणार कधी रण प्रभू तरी
हे कुठवर साहू घाव शिरी

दिसू लागले अभ्र सभोती
विदीर्ण झाली जरी ही छाती
अजून जळते आंतर ज्योती
कसा सावरु देह परी

होय तनूची केवळ चाळण
प्राण उडाया बघती त्यातून
मिटण्या झाले अधीर लोचन
खङग गळाले भूमीवरी

पावन खिंडीत पाऊल रोवून
शरीर पिंजेतो केले रण
शरणागतीचा अखेर ये क्षण
बोलवशील का आता घरी

हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा - स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर



अहोरात्र ... लाथाबुक्क्यांचे अखंड प्रहार सहन करीत उभा असलेला सह्याद्रीचा स्तंभ कडकडला ..... दाही दिशा थरथरल्या ... काळपुरुषाच्याही कानठळ्या बसल्या .... आणि ... जनशक्तीचा अन शिवशक्तीचा नरसिंह या स्तंभातून प्रचंड गर्जना करीत करीत प्रकटला .... अनंत हातांचे अन अगणित तीक्ष्ण नखाग्रांचे हे नरसिंह होते ... शिवराय ....


हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्तितम-तेजा
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतीच्या साजा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

करि हिंदुराष्ट्र हें तूतें, वंदना
करि अंतःकरणज तुज, अभि-नंदना
तव चरणिं भक्तिच्या चर्ची, चंदना
गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

जी शुद्धि हृदाची रामदास शिर डुलवी
जी बुद्धि पांच शाह्यांस शत्रुच्या झुलवी
जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी
जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी
ती शुद्ध हेतुची कर्मी, राहुं दे
ती बुद्धि भाबडया जीवां, लाहुं दे
ती शक्ति शोणितामाजीं, वाहुं दे
दे मंत्र पुन्हा तो, दिले समर्थे तुज ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

गुणी बाळ असा - गोविंदाग्रज



.... आणि .... भीमाशंकराच्या जटात अन नाणेघाटाच्या ओठात वसलेल्या किल्ले शिवनेरीवर उष:काल झाला .... शिवरायांचा जन्म झाला ..... पुत्र जिजाउसाहेबांना झाला ... पुत्र शहाजीराजांना झाला .... पुत्र सह्याद्रीला झाला ... पुत्र महाराष्ट्राला झाला ... पुत्र भारतवर्षाला झाला ... शिवनेरीवर शिवबाचा पाळणा आंदोळू लागला .... महाराष्ट्राची भाग्यभवानी जीजाउसाहेबांच्या मुखाने अंगाईगीत गाऊ लागली ...

गुणी बाळ असा जागसि का रे वाया,
नीज रे नीज शिवराया 
अपरात्रीचा प्रहर लोटला बाई 
तरी डोळा लागत नाही 
हा चालतसे, चाळा एकच असला 
तिळ उसंत नाही जीवाला 
निजवायाचा हरला सर्व उपाय 
जागाच तरी शिवराय  
चालेल जागता चटका 
हा असाच घटका घटका 
कुरवाळा किंवा हटका 
का कष्टविशी तुझी सावळी काया ?
नीज रे नीज शिवराया 

हे शांत निजे बारा मावळ थेट 
शिवनेरी जुन्नरपेठ 
त्या निजल्या ना, तशाच घाटाखाली 
कोकणच्या चवदा ताली 
ये भिववाया, बागुल तो बघ बाळा 
किती बाई काळा काळा 
इकडे हे सिद्धी-जमान 
तो तिकडे अफझुलखान 
पलीकडे मुलुख मैदान 
हे आले रे, तुजला बाळ धराया 
नीज रे नीज शिवराया 

जय देव, जय देव, जय जय शिवराया - स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर



सह्याद्रीच्या कडेकपा-या..... सिंधूसागराच्या लाटा...... आणि संतसज्जनांचे टाळमृदंग..... नियतीच्या गाभा-यातील अदृश्य शिवशक्तीला आवाहन करीत होते .....



जय देव, जय देव, जय जय शिवराया
या, या अनन्य शरणां, आर्या ताराया

आर्यांच्या देशावरी म्लेच्छांचा घाला
आला आला सावध हो शिवभूपाला
सदगदीता भूमाता दे तुज हाकेला
करुणारव भेदूनी तव हृदय न का गेला
जय देव, जय देव, जय जय शिवराया

श्रीजगदंबा जी तव शुंभादीक भक्षी
दशमुख मर्दूनी ती श्रीरघुवर संरक्षी
ती पूता भूमाता, म्लेंच्छा ही छळता
तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता
जय देव, जय देव, जय जय शिवराया

त्रस्त आम्ही दीन आम्ही, शरण तुला आलो
परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो
साधुपरित्राणाया, दुष्कृती नाशाया
भगवन भगवदगीता सार्थ कराया या
जय देव, जय देव, जय जय शिवराया

Sunday, February 20, 2011

प्राणीमात्र झाले दुखी - समर्थ रामदास

तीनशे वर्ष...... तीनशे वर्ष महाराष्ट्र पारतंत्र्याच्या अंध:कारात चाचपडत होता...... वर्षातल्या बाराही अमावस्यांनी जणू गराडा घातला होता....... महाराष्ट्राची भूमी घोड्यांच्या टापांखाली वेदनांनी कण्हत होती ....गा-हाण गात होती......


प्राणी मात्र झाले दुःखी, 
पाहता कोणी नाही सुखी
कठीण काळे, ओळखी धरीनात कोणी 
माणसा खावया अन्न नाही, 
अंथरुण पांघरुण ते ही नाही 
घर कराया सामुग्री नाही, 
विचार सुचेना काही 
अखंड चिंतेच्या प्रवाही, पडले लोक  

हेतू



काल १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची ३८१ वी जयंती होती. त्यानिमित्त दादरच्या शिवाजी मंदिरात 'निर्मिती शिवकल्याण राजाची' हा कार्यक्रम सादर केला गेला. साधारण ३६ वर्षापूर्वी पंडित हृदयनाथ मंगेशकर , लता दीदी आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी एकत्र येऊन महाराजांच्या जीवनावरील प्रसंगांवर आधारित गीतांचा आणि इतिहासाचा संग्रह करून ' शिवकल्याण राजा ' हि ध्वनिफीत काढली.समर्थ रामदास, कुसुमाग्रज, गोविंदाग्रज, कविराज भूषण , शंकर वैद्य आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची गीते , पंडितजींचे संगीत , दीदींचा आवाज आणि बाबासाहेबांचे शिवकथन असा अमृततुल्य योगातून  निर्माण झाला 'शिवकल्याण राजा'
माझ्या तर्फे एक छोटासा प्रयत्न म्हणून संपूर्ण शिवकल्याण राजा मी शब्दरुपाने येथे द्यायचा प्रयत्न करतोय.