Sunday, April 14, 2013

राजा शिवछत्रपती - आवातन

     
      उदो उदो अंबे, तुझा उदो उदो !
     
      हे चंडमुंडभंडासुरखंडीनी जगदंबे, उद्दंडदंडमहिषासुरमर्दिनी दुर्गे, शुंभनिशुंभनिर्दालिनी कालिके, महाराष्ट्रधर्मरक्षिके तुळजाभवानी, एकविरे ये ! सुदिन सुवेळ मी शिवराजाच्या जन्माचं आख्यान मांडलंय, आई, तू ऐकायला ये !
     
      मोरगावच्या मोरेश्वरा, आशीर्वादा ये ! शिंगणापूरच्या शंभूदेवा, डोलायला ये ! जेजुरीच्या खंडेराया, दिवटी घेऊन ये ! म्हाळसाईला, बाणाईला संगे घेऊन ये ! कवळ्याच्या शांतादुर्गे, अंबारीतून ये ! मंगेशाला, गणेशाला संगे घेऊन ये ! कोल्हापूरच्या आई, पाठराखणी ये ! काही चुकलंमाकलं तर मला सुचवायला ये !
     
      रामटेकच्या रामराया झांजा वाजवीत ये ! जरंड्याच्या मारुतराया चिपळ्या घेऊन ये ! पंढरीच्या पांडुरंगा, मृदंग घुमवित ये ! अमरावतीच्या अंबाबाई, पाळणा गायला ये ! वेरुळच्या घृष्णेश्वरा, आंदूळायला ये ! बार्शीच्या भगवंता, काजळ घेऊन ये ! माहूरच्या मातोशिरी, तीट लावण्या ये ! आंबेजोगा जोगेश्वरी, औक्षणाला ये ! ललाटीच्या लेख लिहित्या, सटवाई ये ! जाखाई, जोखाई संरक्षणा ! शिवनेरीच्या शिवाई, तू नाव ठेवण्या ये ! कोकणच्या परशुरामा, साखर वाटण्या ये !
     
      पंढरीच्या नामदेवा, कुंची घेऊन या ! देहूच्या तुकारामा, कौतुकाला या ! नामयाच्या जनाबाई, न्हाउ घाला या ! पाळण्याला सजवीण्या सांवतामाळी या ! सोनाराचे नरहरी घाईघाई या ! बाळलेणी, राजलेणी त्वरे घेऊन या ! लिंबलोण उतराया कान्होपात्रा या ! चोखोबांना, सोयराईला संगे घेऊन या ! दृष्टमणी गुंफोनिया बसवेश्वरा या ! वाघोलीच्या रामेश्वरा, पंचांग घेऊन या ! जन्मराशी कुंडलीच भाग्य सांगा या ! मुक्ताबाई, सखुबाई, बहिणाबाई या ! बाळंतविडा पदराखाली झाकुनिया या ! पैठणच्या नाथांना संगे घेऊन या ! शेखबाबा मोहम्मदा हळूहळू या ! श्रीगोंद्याच्या पेठेतून रिंगणी घेऊन या ! आजोळीचे ढवळे गाया महदंबा या ! रिद्धपुरच्या चक्रधरा, लिळा करा या ! आंब्याच्या दासोपंता,  थंडी निवारा या ! पासोडी पांघराया वेगेवेगे या ! सेनानिळा रामदासा सोहिरोबा या ! आळंदीच्या ज्ञानेश्वरा, भिंतीवरून या ! पुणतांब्याच्या चांगदेवा, वाघावरून या ! नव नाथांनो अलख गर्जत झुंडीसह या !
     
      महाराष्ट्राच्या गंगांनो या ! कृष्णा, गोदा, पवनांनो या ! पूर्णे, वर्धे, इंद्रायणी ये ! तापी, भीमे, पुष्पावती ये ! दूधसागरा फेसाळत ये ! राजापूरच्या, ये गंगे ये ! सहस्त्रशीर्षा सह्याद्री ये ! सातकड्यांसह सातपुड्या ये ! किल्ल्यांच्या तटकोटांनो या ! प्रचंड अवघड बुरजांनो या ! जलदुर्गांनो, दर्यासह या ! तुफान गर्जत लाटांनो या ! देवगिरीच्या यादवतख्ता छत्र चामरांमुकुटांसह ये ! राजकुळासह बिरुदांसह ये ! राजसभेसह, सैन्यासह ये ! देवदेवतांनो, कुळवंतांनो, महाराष्ट्रमंडळींनो अवघे अवघे या ! मी शिवराजाचं चरित्रकीर्तन गातोय. शाहीरांनो, कलावंतांनो, समिक्षकांनो तुम्ही ऐकायला या !
     
      हे नवनवोन्मेषशालीनी, चातुर्यकलाकामिनी, अभिनववाङ्विलासिनी, वीणावादिनी, विश्वमोहिनी, महाराष्ट्रशारदे ये ! मी महाराष्ट्ररसात माझ्या राजाचं गाणं गातोय ! आता केवळ तुझ्यासाठी खोळंबलो आहे, तू विणा छेडीत छेडीत ये !   
 --- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

No comments:

Post a Comment