Saturday, February 18, 2012

निश्चयाचा महामेरू - समर्थ रामदास


महाराजांनी आणि त्यांच्या जीवलगांनी देव मस्तकी धरून तीन तपे हलकल्लोळ केला ... स्थितप्रज्ञ विरागीही आनंदाने गहिवरले ... त्यांना शिवरायांच्या रुपात दिसू लागली महामेरुसारख्या भगीरथाची प्रतिमा ... 

निश्चयाचा महामेरू | बहुत जनासी आधारू |
अखंड स्थितीचा निर्धारु | श्रीमंत योगी ||

नरपती हयपती गजपती | गडपती भूपती जळपती |
पुरंदर आणि शक्ती | पृष्ठभागे ||

यशवंत कीर्तिवंत | सामर्थ्यवंत वरदवंत |
पुण्यवंत नीतिवंत | जाणता राजा ||

आचारशील विचारशील | दानशील धर्मशील |
सर्वज्ञपणे सुशील | सकळा ठायी ||

धीर उदार गंभीर | शूर क्रियेसी तत्पर |
सावधपणे नृपवर | तुच्छ केले ||

देव धर्म गोब्राम्हण | करावया संरक्षण |
हृदयस्थ झाला नारायण | प्रेरणा केली ||

या भूमंडळाचे ठायी | धर्मरक्षी ऐसा नाही |
महाराष्ट्रधर्म राहिला काही | तुम्हा कारणे ||

कित्येक दुष्ट संहारिला | कित्येकासी धाक सुटला |
कित्येकासी आश्रयो जाहला | शिवकल्याण राजा ||

शतकांच्या यज्ञातून उठली - शंकर वैद्य



किल्ले रायगडावर हिंदवी स्वराज्याचं सार्वभौम सिंहासन झळाळू लागलं... भारतवर्षातील इंद्रप्रस्थ, देवगिरी, चित्तोड, कर्णावती, विजयनगर, वारंगळ आणि अशाच भंगलेल्या सर्व सार्वभौम सिंहासनांच्या जखमा रायगडावर बुझल्या आज... हि भूमी राजश्रीयाविराजित सकलसौभाग्य संपन्न झाली..

शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला 
दहा दिशांच्या हृदयामधूनी अरुणोदय झाला || धृ ||

शिवप्रभुंची नजर फिरे अन उठे मुलुख सारा 
दिशा दिशा भेदीत धावल्या खड्गाच्या धारा 
हे तुफान स्वातंत्र्याचे 
हे उधाण अभिमानाचे 
हे वादळ उग्र वीजांचे
काळोखाचे तट कोसळले चिरा चिरा ढळला ||१||

कडेकपारी घुमू लागले विजयाचे गान 
जळल्या रानातूनी उमलले पुन्हा नवे प्राण 
रायगडावर हर्ष दाटला खडा चौघडा झडे
शिंगाच्या ललकारीवरती भगवा झेंडा उडे 
शिवराय भाग्य देशाचे 
हे संजीवन प्राणांचे 
हे रूप शक्तियुक्तिचे 
हा तेजाचा झोत उफाळून सृष्टीतून आला ||२||

गंगा सिंधू यमुना  गोदा कलशातून आल्या 
शिवरायाला स्नान घालूनी धन्य धन्य झाल्या 
धीमी पाउले टाकीत येता रुद्राचा अवतार 
अधीर हृदयातूनी उमटला हर्षे जयजयकार 

" प्रौढप्रताप  पुरंदर , क्षत्रिय कुलावतंस ,
  सिंहासनाधीश्वर ,महाराजाधिराज ,
  शिवछत्रपती महाराज "

'शिवछत्रपतींचा जय हो ||'
'श्रीजगदंबेचा जय हो ||'
'या भरतभूमिचा जय हो ||'
जयजयकारातूनी उजळल्या शतकांच्या माला || ३ ||


इंद्र जिमी जृम्भपर - कविराज भुषण



इतिहासाच्या पानापानावर साक्षात शिवशंकर तांडव करीत होता... दोन धृवांचा मृदंग दुमदुमत होता ... मन्मत्थावर तिसरा डोळा विस्फारला जात होता... शिवशस्त्रे असुरावर सुटत होती... आश्चर्यमुग्ध झालेल्या कविराज भुषणांच्या प्रतिभेनेही शंकराच्या आवेषात रायगडावरच्या राजसभेत मांडले होते तांडव... क्षणात रौद्रतांडव....  क्षणात आनंदतांडव... 

इंद्र जिमी जृम्भपर  
बाढव सुअंभपर
रावण सदंभपर 
रघुकुलराज है

पवन बारीबाह्पर 
संभू रतीनाहपर 
ज्यो सहसबाहपर  
राम द्विजराज है 

दावा द्रुमदंडपर 
चीता मृगझुंडपर
भूषण वितुंडपर 
जैसे मृगराज है 

तेज तम अंसपर 
कान्ह जिमी कंसपर 
त्यो मलीच्छ वंसपर 
सेर सिवराज है ...

आनंद वनभुवनी - समर्थ रामदास



सह्याद्री, समुद्र आणि शिवराय यांनी एकवटून मांडलेला स्वातंत्र्यसंग्राम विजयी झाला.... हिंदवी स्वराज्य साकार झालं.... लेकीसुना संतसज्जन गाईवासरं सारे सारे आनंदले.... हे राज्य व्हावे हि तो श्रींचीच इच्छा होती.... संतांच्या स्वप्नांचा कल्पवृक्ष मोहरला.... वनी आनंद .. भुवनी आनंद .. आनंदी आनंद वनभुवनी ...

स्वर्गीची लोटला जेथे 
रामगंगा महानदी 
तीर्थासी तुळणा नाही 
आनंद वनभुवनी 

त्रैलोक्य चालल्या फौजा 
सौख्य बंध विमोचने 
मोहीम मांडली मोठी
आनंद वनभुवनी

येथून वाढला धर्मु
रमाधर्म समागमे 
संतोष मांडला मोठा 
आनंद वनभुवनी 

भक्तांसी रक्षिले मागे 
आताही रक्षिते पहा 
भक्तासी दिधले सर्वे 
आनंद वनभुवनी

येथुनी वाचती सर्वे 
ते ते सर्वत्र देखती 
सामर्थ्य काय बोलावे 
आनंद वनभुवनी

उदंड जाहले पाणी 
स्नानसंध्या करावया 
जप तप अनुष्ठाने 
आनंद वनभुवनी

बुडाली सर्वही पापे 
हिंदुस्थान बळावले 
अभक्तांचा क्षयो झाला
आनंद वनभुवनी

म्यानातून उसळे तरवारीची पात - कुसुमाग्रज



प्रतापराव गुजरांस महाराजांचं आज्ञापत्र सुटलं. "सर्ववत स्वराज्यावर वारंवार चालून येणाऱ्या गनिमास गर्दीस मिळवल्याविना  आम्हास रायगडावर तोंड दाखवू नका ". आणि मग ..... 

म्यानातून उसळे तरवारीची पात 
वेडात मराठे वीर दौडले सात 
सरसेनापती प्रतापराव गुजर 

ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले 
सरदार सहा सरसावूनी उठले शेले 
रिकिबीत टाकले पाय पेलेले भाले 
उसळले धुळीचे मेघ सात निमिषात 

आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना 
अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना 
छावणीत शिरले थेट भेट गनिमांना 
कोसळल्या उल्का जळत सात दर्यात 

खालून आग वर आग आग बाजूनी 
समशेर उसळली सहस्त्र क्रूर इमानी 
गर्दीत लोपले सात जीव ते मानी 
खग सात जळाले अभिमानी वणव्यात 

दगडावर दिसतील अजुनी तेथल्या टाचा 
ओढ्यात तरंगे अजुनी रंग रक्ताचा 
क्षितिजावर दिसतो अजुनी मेघ मातीचा 
अद्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात